बेळगाव : रणरणत्या उन्हात हातात भगवा ध्वज घेऊन आपल्या शिलेदारांसह दररोज 40 किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालत भगव्याचा जागर करणारा अवलिया म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत दादा कोंडुस्कर.
मराठी अस्मितेचे प्रतीक, मराठ्यांचा इतिहास सांगणारा भगवा आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वार्थी राजकारण्यांकडून वेळोवेळी होणारा अवमान रोखण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती नेते रमाकांत दादा कोंडुस्कर यांनी किल्ले राजहंसगड येथून जागर भगव्या ध्वजाचा, हुंकार मराठी मनाचा असे म्हणत “शिवसन्मान’ पदयात्रा काढली.
भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करीत असताना आपला सीमाभाग मात्र पारतंत्र्यात आहे की काय अशी स्थिती सध्या बेळगांवसह संपूर्ण सीमाभागात पाहायला मिळत आहे. मराठी भाषिकांवर कानडीकरणाचा वरवंटा फिरवण्याची एकही संधी कर्नाटक प्रशासन सोडत नाही. मराठी तरुण बेरोजगार झाला आहे परिणामी तरुण व्यसनाधीन बनत चालला आहे. प्रशासन मराठी भाषिकांची गळचेपी करत आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांचे भवितव्य अंधःकारमय झाले आहे. मराठ्यांचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होताना मूक गिळून गप्प बसणारे राजकारणी स्वतःच्या सोयीनुसार महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या सत्ताधाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ही “शिवसन्मान” पदयात्रा रमाकांत कोंडुस्कर यांनी काढली आहे. ही पदयात्रा सामान्य जनतेसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे. उन्हातान्हाची तमा न बाळगता बुधवार दि. 23 फेब्रुवारी पासून राजहंसगडापासून ही यात्रा चालू झाली ती यरमाळ, अवचारहटी मार्गे धामणे येथे पोहोचली. धामणे ग्रामस्थांनी “शिवसन्मान” पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती (धामणे विभाग) यांच्याकडून जाहीर पाठिंबा व्यक्त केला. त्यानंतर गुरुवारी ही पदयात्रा देसुर, झादशहापूर, सुळगे, मच्छे आदी भागातून हुंचेनट्टी, बहाद्दरवाडी, खादरवाडी, आदी भागातून देखील “शिवसन्मान” यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गल्लोगल्ली युवक संघ “शिवसन्मान” यात्रेचे स्वागत करून पाठिंबा व्यक्त करत आहेत. तर मायभगिनी रामकांत दादांचे औक्षण करून शुभाशीर्वाद देत आहेत. या पदयात्रेत वस्तीच्या ठिकाणी व्याख्यान तर कधी मराठी भाषिकांना संबोधित करणारी भाषणे झाली. शुक्रवारी ही पदयात्रा भवानी नगर परिसरातून चालू झाली ती टिळकवाडी येथे पोहोचली यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सहकुटुंब या “शिवसन्मान” पदयात्रेचे स्वागत केले व रमाकांत कोंडुस्कर यांच्या पुढील वाटचालीस शुभाशीर्वाद दिले. त्यानंतर ही पदयात्रा नानावाडी मार्गे मार्गक्रमण करत संध्याकाळी अनगोळ येथे पोहोचली. त्यावेळी अनागोळ येथील नागरिकांनी अभूतपूर्व उत्साहात “शिवसन्मान” पदयात्रेचे स्वागत केले. तिथून ही पदयात्रा वडगाव परिसरात पोचली आहे. ही “शिवसन्मान” यात्रा पुढील काळात सकारात्मक बदल घडवेल हे नक्की.
Belgaum Varta Belgaum Varta