येळ्ळूर : येत्या 19 मार्च रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने येळ्ळूर राजहंसगड येथे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक सोहळा साजरा करण्याचा निश्चय केला आहे. सदर दुग्धाभिषेक सोहळ्यात प्रामुख्याने सहभागी होऊन मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. शांताराम कुगजी हे होते.
प्रारंभी सरचिटणीस श्री. प्रकाश अष्टेकर यांनी या सोहळ्यात येळ्ळूरने महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. या बैठकीत शिवसंत संजय मोरे यांनी शिवछत्रपतींचा दुग्धाभिषेक कार्यक्रम पार पाडण्यासाठी किल्ले रायगडचे पौरोहित्य आणण्यासंबंधी माहिती दिली. सदर बैठकीत सर्वश्री दत्ता उघाडे, राजू पावले, विलास घाडी, एम. वाय. घाडी, महेश जुवेकर, ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर, कृष्णा शहापूरकर यांनी सूचना मांडल्या
या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, जोतिबा चौगुले, वनिता परीट, शिवाजी नांदुरकर, भुजंग पाटील, वाय. सी. इंगळे, आनंद कृष्णा घाडी, मधु पाटील, गोविंद बापूसाहेब पाटील, परशराम घाडी, तानाजी पाटील, भरत मासेकर, उदय जाधव, मनोहर घाडी, यल्लापा कुगजी, समीर परीट आदी बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.
कार्याध्यक्ष दुद्दापा बागेवाडी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta