बेळगाव युवा समितीचा इशारा
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने आज गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी महानगरपालिका बेळगाव आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मराठी फलकांसाठी महानगर पालिका प्रशासक, जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारले.
वरील विषयाप्रमाणे निवेदन देण्यात आले की, बेळगाव महानगर पालिकेत पूर्वी पासून असलेले मराठी कन्नड आणि इंग्रजी भाषेत असलेले फलक काढून फक्त एकच कन्नड भाषेत फलक लावले जात आहेत. बेळगावसह सीमाभागात बहुसंख्य मराठी भाषिक नागरिक असल्याने त्यांना त्यांच्या मातृभाषेत सुविधा देणे आवश्यक आहे.
भारतीय संविधानाच्या कलम 29 प्रमाणे भाषिक अल्पसंख्याकांना मातृभाषा लिपी आणि संस्कृती संरक्षित करण्याचा अधिकार आहे. आजपर्यंत बेळगाव महानगर पालिकेत मराठी भाषिकांची सत्ता राहिली आहे, पण मागील 3 वर्षे महानगरपालिकेची निवडणूक न झाल्याने तिथे प्रशासक म्हणून मा. जिल्हाधिकारी साहेब आपली नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हा मराठी भाषेची चाललेली ही गळचेपी आपण वेळीच थांबवावी प्रशासकीय यंत्रणेमध्ये काही तथाकथित कन्नड संघटनांच्या हस्तक्षेपातून बेळगावमध्ये भाषिक तेढ निर्माण होत आहे, तेव्हा त्यांच्या दबावाला बळी न पडता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भाषिक अधिकाराचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.
तरी महानगरपालिकेत तसेच व्याप्तीतील फलकामध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा.
सरकारी योजनांची माहिती, उतारे, आणि कागदपत्रे मराठीत देण्यात यावीत.
मा.उच्च न्यायालय धारवाड खंडपीठाने दि. 18 नोव्हेंबर 2013 रोजी दिलेल्या निकालात (WRIT PETITION No.79953/2013(LB-RES)) मराठी भाषिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना सर्व कागदपत्रे तसेच भाषिक अधिकार द्यावेत असे नमूद केले आहे. आजपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतली नाही. तेव्हा हा न्यायालयाचा सुद्धा अवमान आहे.
आपण सदर घडणाऱ्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांचे भाषिक अधिकार प्राप्त करून द्यावेत आणि महानगर पालिका बेळगावमधील मुख्य फलक आणि इतर माहिती फलकामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात यावा.
यावेळी बोलताना युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी जर येत्या आठवड्यात फलकांवर मराठी भाषेचा वापर झाला नाही तर त्यानंतर बेळगावातील मराठी भाषिकांनी कोणत्याही प्रकारचा कर, फाळा भरू नये अश्या प्रकारचे आंदोलन बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून छेडले जाईल असा इशारा दिला.
भाषिक अल्पसंख्याक कार्यालय बेळगाव यांनाही सदर निवेदन देण्यात आले.
यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, विनायक कावळे आदी उपस्थित होते.