
शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर या दोन्ही मतदारसंघांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार निवडीची प्रक्रिया जाहीर केली. 4 ते 6 एप्रिलदरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार विजयी होईल, यासाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहन शहर म. ए. समितीने कार्यकर्त्यांना केले.
शहर म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीदरम्यान विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी प्रत्येक विभागातील सदस्यांची कमिटीमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपापल्या भागातून म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त नावे द्यायची आहेत.
माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे निवड कमिटीची नियुक्ती केली जाणार आहे. या समितीमध्ये महेश जुवेकर, राजू बिर्जे, महादेव पाटील, दत्ता उघाडे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचसोबत इच्छुकांनाही या कमिटीमध्ये स्थान देण्यात येणार असून त्यानंतर निवड कमिटी स्थापन केली जाईल.
बेळगाव उत्तरसाठी दत्ता जाधव, रायमन वाझ, गणेश ओऊळकर, गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कमिटी कार्यरत असेल. शहरासह ग्रामीण भागातील समिती कार्यकर्त्यांना या कमिटीमध्ये स्थान दिले जाणार असून त्यांच्याकडूनच जनतेचा कौल घेऊन उमेदवाराची अंतिम निवड केली जाणार आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर म. ए. समितीचे उपाध्यक्ष बी. ए. येतोजी होते. व्यासपीठावर अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे उपस्थित होते. या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी आपली मते मांडत बेळगाव दक्षिणमध्ये अधिकाधिक मतदान मिळविण्यासाठी पर्याय सुचविले. त्याचबरोबर या वेळेला कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
राजू पाटील, शिवराज पाटील, विश्वनाथ सूर्यवंशी, सागर पाटील, श्रीकांत मांडेकर, मोतेश बार्देशकर, कृष्णा अनगोळकर, रणजित हावळाण्णाचे, अहमद रेशमी, मदन बामणे, संजय सातेरी, महादेव पाटील, प्रकाश अष्टेकर, यल्लाप्पा रेमाण्णाचे, प्रशांत भातकांडे, शुभम जाधव, एम. आर. पाटील, राजेंद्र मुतगेकर, आप्पासाहेब गुरव, शंकर बाबली, श्रीकांत कदम, उमेश कुऱ्याळकर यासह इतर सदस्यांनी आपली मते मांडली.
Belgaum Varta Belgaum Varta