भाजपतर्फे महांतेश कवटगीमठ, काँग्रेसतर्फे चन्नराज हट्टीहोळी, अपक्ष लखन जारकीहोळी
बेळगाव : बेळगाव विधान परिषदेच्या जिल्ह्यातील दोन जागांसाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी भाजप, काँग्रेस, आप आणि अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी दाखल करीत असताना भाजप, काँग्रेस आणि अपक्ष लखन जारकीहोळी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. भाजपच्यावतीने विधान परिषदेसाठी आमदार महांतेश कवठगीमठ यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी आर. व्यंकटेश कुमार यांच्याकडे दाखल केला.
यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री रमेश जारकीहोळी, वनमंत्री उमेश कत्ती, धर्मदाय मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगल अंगडी, आमदार आनंद मामणी, आमदार अभय पाटील, पी. राजू, अनिल बेनके आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षातर्फे चन्नराज हट्टीहोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर उपस्थित होते. लखन जारकीहोळी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. आपच्यावतीने आज शंकर हेगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शेवटच्या दिवसापर्यंत विधान परिषदेच्या दोन जागेसाठी 5 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.
काँग्रेस पक्षाच्यावतीने सीपीएड मैदानावरून मिरवणूक काढण्यात आली. लखन जारकीहोळी समर्थकांनी सरदार मैदानावरून आपली मिरवणूक काढली. भाजपाच्या समर्थकांनी कन्नड साहित्य भवनातून मिरवणूक काढली.
विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी 10 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 8 हजार 875 मतदार आहेत. याबाबत अंतिम मतदारयादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून या निवडणुकीसाठी महापालिकेवर निवडून आलेले नगरसेवकदेखील पात्र ठरले आहेत. त्यामुळे मतदारांचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण 15 नगरपालिका आणि नगरपंचायतींचे सदस्य मतदान करणार आहेत. त्याचबरोबर 14 तालुक्यातील 496 ग्राम पंचायतींचे सदस्यदेखील मतदान करणार आहेत.