संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधान परिषद निवडणुक हार-जीतचा फैसला जारकीहोळी बंधुंवर असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाने पराजयाची खापर जारकीहोळी बंधुंवर फोडण्याचा इरादा पक्का केलेला दिसत आहे. बेळगांव विधानपरिषदची निवडणूक तशी तिरंगी अत्यंत चुरशीने होणार आहे. निवडणुकीत भाजपाने महांतेश कवठगीमठ यांना तर काँग्रेसने चन्नराज हट्टीहोळी यांना आखाड्यात उतरविले आहे. दोघा मातब्बर पक्षाच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी वरचढ झालेले दिसत आहेत. बेळगांव जिल्ह्यांत भाजपाचे तेरा आमदार दोन खासदार, दोघे मंत्री असे बलाबल असताना गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यावर भाजपाचे उमेदवार महांतेश कवठगीमठ यांची हार-जीतचा फैसला सोपविला जात आहे. माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांना एकीकडे बंधूप्रेम आणि दुसर्या बाजूला पक्षाची लाज राखताना इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झालेली दिसत आहे. रमेश जारकीहोळी यांना अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांना दुसर्या मतांवर विजयी करावयाचे आहे. याकरिता त्यांना भाजपाची साथ कांही मिळेनासी झाली आहे. आरभावींचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचा पाठिंबा त्यांना लाभला आहे. अशाच बिकट परिस्थितीचा सामना कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना करावा लागत आहे. बेळगांव जिल्ह्यात काँग्रेसचे सहा आमदार असले तरी काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांचे भवितव्य सतीश जारकीहोळी यांच्यावर सोपविले गेले आहे.
विजयाचे श्रेय सर्वांना.. पराजयाचे खापर जारकीहोळींना…
विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार महांतेश कवठगीमठ विजयी झाले तर त्याचे श्रेय जिल्ह्यातील दोन मंत्रीमहोदयांना अकरा आमदारांना, दोन खासदारांना दिले जाणार आहे. कवठगीमठ पराजित झाले तर त्याला रमेश जारकीहोळी हेच कारणीभूत ठरवून त्यांच्या माथ्यावर पराजयाचे खापर फोडले जाणार आहे. हीच स्थिती काँग्रेसची आहे. चन्नराज हट्टीहोळी यांच्या विजयाचे श्रेय सर्वांना पराजयाचं खापर मात्र सतीश जारकीहोळी यांच्यावर फोडले जाणार आहे. रमेश जारकीहोळी यांना एकीकडे बंधूप्रेम आणि दुसर्या बाजूला पक्षाची धुरा सांभाळताना करावी लागणारी कसरत या निवडणुकीत तशी लक्षवेधी ठरली आहे. राज्य आणि जिल्ह्याच्या राजकारणात ही निवडणूक महत्वपूर्ण समजली जात असल्याने सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागून राहिलेले दिसताहे.
