Wednesday , December 10 2025
Breaking News

खासदार संजय राऊत यांना सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर

Spread the love

 

बेळगाव : 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी आचारसंहिता लागू असताना मराठी व कन्नड भाषिकात भाषा वादासह तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्यात महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना बेळगाव चतुर्थ जेएमएफसी न्यायालयाने आज सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, गेल्या 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी आचारसंहिता लागू असताना रीतसर परवानगी घेऊन बेळगाव लाईव्ह न्यूज पोर्टलचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे 12 मार्च 2018 रोजी सायंकाळी 6:30 वाजता या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बिळगोजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत, किरण ठाकूर आणि सुरेंद्र नाईक हे उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणात खासदार राऊत यांनी ‘जर कर्नाटकात महाराष्ट्राची एक बस जाळली तर महाराष्ट्रात कर्नाटकाच्या 100 बसेस जाळल्या जातील’, असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य म्हणजे बेळगावातील मराठी व कन्नड समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा, भाषावाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत कर्नाटक सरकारने टिळकवाडी पोलीस ठाण्यात वर्धापन दिन सोहळ्याचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे अशा चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेत 153 (ए), 505 (2), 125, 171 (एफ) या कलमान्वये लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला. तसेच त्यानंतर पोलिसांनी तपास करून 4 थ्या जेएमएफसी न्यायालयात संबंधित चौघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर खासदार राऊत यांनी बेळगाव मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने कांही अटींवर जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आज बुधवारी ट्रायल कोर्टासमोर हजर राहून आपला जामीन मंजूर करून घेतला. त्यानुसार बेळगावच्या चतुर्थ जेएमएफसी न्यायालयाने कांही अटींवर खासदार राऊत यांचा जामीन मंजूर केला आहे. सदर खटल्यात खासदार संजय राऊत यांच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. मारुती कामाण्णाचे, ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. शंकर बाळ नाईक, ॲड. महेश मजुकर, ॲड. ज्योतिबा पाटील व इतर वकील काम पाहत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव कँटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर सीबीआयचा छापा

Spread the love  बेळगाव : टेंडर वाटप आणि बेकायदेशीर भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या तीव्र आरोपांनंतर, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *