धामणे येथील प्रकार : पोलिसांची बघ्याची भूमिका
बेळगाव : अतिउत्साही भाजप कार्यकर्त्यांनी धामणे येथे घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी समिती कार्यकर्त्यांच्या घरासमोर केली. आतषबाजी करताना फटाके गवताच्या गंजीवर टाकल्याने गवतगंजीला आग लागली. त्यामुळे शेतकरी भैरू धर्मूचे आणि ग्रा. पं. सदस्य एम. आर. पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे.
धामणे येथील भाजप कार्यकर्ते आपले उमेदवार विजयी झाले म्हणून गावभर फटाके फोडून फिरत होते. या कार्यकर्त्यांनी गावभर फटाके लावत येथील लक्ष्मीनगरमधील समितीचे कार्यकर्ते एम. आर. पाटील यांच्या घरासमोर आले. तेथे घरासमोर कठड्यावर वयस्कर महिला व लहान बालके होती. या सर्वांचा विचार न करता फटाके फेकत होते. फटाके गवतगंजीवर फेकल्याने गवतगंजीने लागलीच पेट घेतली. दुपारी भर उन्हात हा प्रकार घडल्याने गवतगंजीने लागलीचे पेट घेतली. शेजाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा मोठे नुकसान झाले आहे.
फटाके उडवत असताना पोलीस शिपाई होते. परंतु त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याने हा अनर्थ घडल्याचे घटनास्थळावर उपस्थित नागरिकांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी वडगाव ग्रामीण पोलिसांत तक्रार देण्यात आल्याचे कळते.
Belgaum Varta Belgaum Varta