
बेळगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बेळगाव जिल्ह्यातील तिघांनी यशाचा झेंडा रोवला आहे. सौंदत्ती तालुक्यातील तल्लूरच्या श्रृती गट्टीने 362 वे स्थान मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. कागवाड तालुक्यातील उगारच्या आदिनाथ तमदडीने 566 वे व चिक्कोडी तालुक्यातील शमनेवाडीच्या अक्षय पाटीलने 746 वे स्थान मिळवले.
श्रुतीने पाचव्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. तिने विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सहा वर्षांपूर्वी बीएससीमध्ये तिने धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठात सात सुवर्णपदके पटकावली होती. तिचे माध्यमिक शिक्षण हुक्केरीजवळील शिरढोणमधील गंगाधर इंग्रजी माध्यम शाळेतून झाले. धारवाडमधील कर्नाटक कॉलेजात तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. नवी दिल्लीत यूपीएससीचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने बंगळूरमधील एका आयएएस कोचिंग सेंटरमध्ये नोकरी पत्करली. पाचव्या प्रयत्नात तिने यूपीएससी उत्तीर्ण केली. तिचे वडील शिवानंद यरगट्टी एक निवृत्त शिक्षक आहेत.
अक्षयकुमार पाटील अभियांत्रिकी पदवीधर असून त्यानेसुद्धा सहाव्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. म्हैसूरमधील रामकृष्ण विद्याशाळेत त्याचे माध्यमिक शिक्षण झाले. बीएमएस कॉलेजमधून त्यानेअभियांत्रिकी पदवी मिळवली. यूपीएससीच्या तयारीसाठी त्याने दिल्लीतील एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला होता. त्याचे वडील राजागौडा पाटील शेतकरी आहेत.
राज्यातील एकूण 25 जणांनी यूपीएसी परीक्षेत यश मिळवले आहे. त्यात एच. एस. भावना या मुलीने 55 वे स्थान मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. धारवाडमधील परिवहन महामंडळातील बसचालकाच्या मुलाने 589 वे स्थान मिळविले आहे. सिद्दलिंगप्पा पुजार असे त्याचे नाव आहे. तो अभियांत्रिकी पदवीधर असून बंगळूरमधील एका कंपनीत नोकरी करत आहे. विजापुरातील सरौरा तांड्यावरील (ता. मुद्देबिहाळ) वाय. अर्जुन नायक याने 809 वा क्रमांक मिळवला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta