बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने जाहीर केलेल्या पाच गॅरंटी योजनांपैकी शक्ती योजने मागोमाग काल रविवारपासून सुरू झालेल्या ‘गृहज्योती’ या दुसऱ्या योजनेच्या नांव नोंदणीसाठी सध्या बेळगाव वन केंद्रामध्ये नागरिकांची तोबा गर्दी झालेली पहावयास मिळत आहे.
घरगुती वीज जोडणी असणाऱ्या ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देणाऱ्या गृहज्योति योजनेच्या नांव नोंदणीला शहरात काल रविवारी दुपारी प्रारंभ झाला आहे. सदर योजनेसाठीची नांव नोंदणी शहरातील बेळगाव वन कार्यालयामध्ये करावी लागणार असल्यामुळे सध्या या कार्यालयात लाभार्थी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. आधार कार्ड, आरआर नंबर, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल घेऊन सदर केंद्रामध्ये नागरिकांच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत.
सेवा सिंधू वेबसाईटवर बेळगाव वन कार्यालयांमध्ये ग्राहकांची माहिती भरून घेतली जात आहे. मात्र ही प्रक्रिया म्हणावी तशी वेगाने सुरू नसल्यामुळे नागरिकांवर ताटकळत थांबण्याची वेळ आली होती. काल कांही जणांचे आधार कार्ड वरील नांव आणि वीज मीटरवरील नांव यामध्ये तफावत असल्यामुळे नांव नोंदणी रद्द होऊन तासभर रांगेत थांबलेल्या या नागरिकांवर नोंदणी न करताच घरी माघारी परतण्याची वेळ आली होती. गृहज्योती नांव नोंदणीसाठी ज्या व्यक्तीच्या नावावर विद्युत मीटर आहे, त्या व्यक्तीचाच आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे. यामुळे काल रविवारी अनेकांना माघारी फिरावे लागले. नांव नोंदणी यशस्वी झालेल्या ग्राहकांकडून 20 रुपये शुल्क आकारून पोचपावती देण्यात येत आहे. गृह ज्योति योजना रविवारी सकाळी 11 वाजता सादर करण्यात आल्यानंतर कांही क्षणातच बेळगाव वन केंद्रातील सेवा सिंधू पोर्टलचा सर्व्हर डाऊन झाला. मोठ्या संख्येने लाभार्थी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे आल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे अर्ज प्रक्रियेत कांही काळ अडथळा निर्माण झाला. सर्व्हर सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांना तांत्रिक तंत्रज्ञांना पाचारण करावे लागले होते.
“गृहज्योती”साठी पहिल्या दिवशी 55 हजार लाभार्थी
कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या गृहज्योती योजनेसाठी काल रविवारी पहिल्या दिवसाअखेर राज्यभरात एकूण 55000 लाभार्थींनी नांव नोंदणी केली आहे. गृहज्योति योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन द्वारे अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थीना सेवा सिंधू पोर्टल मधील खास डिझाईन केलेल्या वेब पेजवर लॉगिन करावे लागणार आहे. या माध्यमातून काल पहिल्या दिवशी राज्यात 55 हजार ग्राहकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. जास्तीत जास्त लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी रविवारी सुट्टी दिवशी देखील नांव नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे.