बेळगाव : मी कोण आणि माझ्यासमोर डी. के. शिवकुमार कोण लागून गेलेत? हवा तर खुला मुकाबला होऊ दे. कनकपुरच्या त्या पठ्ठ्याला निवडणूक निकाला दिवशी मी कोण आहे ते दाखवून देतो, असे ओपन चॅलेंज माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी डीकेशींना आज दिले.
विधानपरिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे भाजप व काँग्रेसच्या बिनीच्या नेत्यांमध्ये जोरदार रणकंदन माजत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी आमदार रमेश जारकीहोळी यांची बंडखोर म्हणून संभावना केली होती. त्याला आज आमदार रमेश जारकीहोळी यांनी प्रत्युत्तर दिले. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील प्रचाराप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे महांतेश कवटगीमठ विजयी व्हावेत यासाठी जिल्ह्याचा कानाकोपरा पिंजून काढत आहे. भाजप उमेदवार जगदीश कवटगीमठ यांना निवडून आणणे आणि काँग्रेसला पराभूत करणे हे आमचे सध्याचे ध्येय आहे. डीकेशींच्या कुठल्याही आरोपाला आम्ही आता उत्तर देणार नाही. निवडणुकीच्या निकाला दिवशी 14 डिसेंबर रोजी त्यांना त्यांच्या प्रत्येक शब्दाचे आणि आरोपाचे चोख परखड उत्तर मिळेल. आम्ही सध्या निवडणुकीच्या मूडमध्ये आहोत. एकदा निकाल लागू दे मग डीकेशींची सर्व पोलखोल करतो. 1985 पासूनची कुंडली मांडतो. डीकेशी कुटुंब आणि जारकीहोळी कुटुंब कोण होते? काय होते? सगळे जाहीर करतो, असे खुले आव्हान आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिले.
दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठांचा मला आशीर्वाद आहे. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच आज मी ताठ मानेने उभा आहे. अन्यथा जे कांही षडयंत्र रचण्यात आले होते त्यात अडकवून यांनी मला संपवले असते. संघ परिवारातील नेत्यांच्या पाठिंब्याने मी नेता झालो आहे, असेही आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. ब्लॅकमेल कोण करतं? हे 14 तारखेला सांगतो. त्यादिवशी डीकेशी -जारकीहोळी यांच्यात ओपन वॉर होऊ द्या. मात्र तत्पूर्वी आधी विधान परिषद तर वाचवा असा खोचक सल्ला देत जारकीहोळी यांनी केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना खुले आव्हान दिले.
Belgaum Varta Belgaum Varta