बेळगाव : विजेची मोटार सुरू करण्यासाठी गेला असता विजेचा धक्का बसून तरुण विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बाची येथे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. कुणाल कल्लाप्पा कुट्रे (वय १७, मूळचा रा. रामनगर- कडोली, सध्या रा. बाची) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
तो शेती व्यवसाय करत होता. दीड वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे तो आई, बहीण यांच्या सोबत बाची येथे आपल्या मामाच्या गावीच राहत होता. सोमवारी सायंकाळी घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा धक्का बसला. पावसामुळे शॉर्टसर्किटने मोटारमध्ये विद्युत प्रवाह सुरू होता. त्याचा झटका बसल्याने कुणाल हा विहिरीत कोसळला. विहिरीमध्ये पाणी नसल्याने त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेमुळे कुट्रे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून बाची व कडोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई, बहीण, आजोबा, आजी, काका, काकू असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta