तुर्केवाडीतील ९१-९२ दहावी बॅचचा उपक्रम; सपत्नीक मिरवणूक काढून जाहीर सत्कार
चंदगड : सैन्यदलातील मोठ्या पदावरुन निवृत्त होऊन घरी परतलेल्या अधिकाऱ्याचा वर्गमित्रांनी गावात मिरवणूक काढून जंगी सत्कार केला. मौजे तुर्केवाडीतील (ता. चंदगड) १९९१-९२ दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. १) ब्रह्मलिंग देवालयात हा सोहळा घडवून आणून एका सैनिकाला अनोखी मानवंदना दिली.
सुभेदार हरी गावडे २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० जून रोजी सैन्यदलातून निवृत्त झाले. त्याबद्दल जाहीर सत्कार करुन त्यांच्या देशसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय वर्गमित्रांनी आधीच घेतला होता. निवृत्तीनंतर गावात येताच त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याचे ठरले होते. त्यानुसार ते शनिवारी सकाळी ११ वाजता गावच्या सीमेवरील मरगूबाई मंदिरात दाखल होताच त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात उघड्या जीपमधून त्यांची सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत वर्गमित्रांसह आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. रवळनाथ मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता झाली. तिथून फुलांचा वर्षाव करुन त्यांना ब्रह्मलिंग देवालयातील कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. सरपंच आर. व्ही. तेली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त शिक्षक व्ही. आर. गावडे, आर. एन. पाटील, के. के. कांबळे, माजी जि. प. सदस्य बी. डी. पाटील, गोपाळ ओऊळकर, जे. ओ. गावडे, रामू गावडे व लक्ष्मी गावडे व्यासपीठावर होते.
जानबा चौगुले यांनी प्रास्ताविक केले. सुनील गावडे यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करुन दिला. प्रारंभी सैन्यदलातून यापूर्वी निवृत्त झालेले वर्गमित्र उत्तम पाटील, राजकुमार ओऊळकर व रमेश मसूरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व वर्गमित्रांच्या हस्ते हरी गावडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गणेश प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी सविता गावडे यांचा माजी सरपंच कल्पना अडकूरकर यांनी साडीचोळी देऊन सत्कार केला. त्यानंतर ग्रामपंचायत, विविध संस्था व आजी-माजी सैनिकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी चौगुले, गोपाळ ओऊळकर, आर. एन. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. हरी गावडे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्री. तेली यांनी अध्यक्षीय समारोप केला. एम. के. गावडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी भरमाणा गावडे, अमृत मोरे, संजय गावडे, समीर शेनोळकर, गजानन बेळगावकर, संजय हाजगूळकर, विठ्ठल सुतार, बाळू अडकूरकर, दत्ता उंबळकर, लक्ष्मण बिजगर्णीकर, मायकेल फर्नांडीस यांच्यासह आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta