बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून बेळगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या मंगाई देवीची यात्रा मंगळवार दि. ११ रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. वडगाव परिसरात जय्यत तयारी केली जात आहे. मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यासोबतच खेळण्यांची दुकाने, आकाश पाळणे, संसारोपयोगी साहित्याची दुकाने, मिठाई दुकाने सजली आहेत.
बेळगाव परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून मंगाई देवीच्या यात्रेचा उल्लेख केला जातो. पेरणीची कामे पूर्ण झाल्यानंतर देवीची यात्रा होत असते. यात्रेपूर्वी महिनाभर वडगाव परिसरात वार पाळले जातात. मंगाई देवीची यात्रा जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा तयारीला वेग आला आहे. यात्रेसाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.
मंगळवार दि. ११ रोजी सकाळपासून यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रा एक दिवस असली तरी तयारी मात्र जोरदार केली जाते.
बेळगाव, गोवा, महाराष्ट्र येथून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे सध्या यरमाळ रोड, विष्णू गल्ली. कॉर्नर या परिसरात खेळण्यांची दुकाने थाटली जात आहेत. याचबरोबर गृहोपयोगी वस्तू खाद्यपदार्थ व आकाश पाळणे जोडण्यात आले आहेत.
वडगाव परिसरात जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे व चिखल साचला होता. शुक्रवारी रात्री या खड्ड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात खडी टाकण्यात आली. हजारो भाविक या परिसरात येत असल्यामुळे यापूर्वीच खड्डे बुजविणे गरजेचे होते. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांना आता नाहक मनस्ताप सोसावा लागणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta