बेळगाव : फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या पुढाकाराने जांबोटी रस्त्यावरील बामणवाडी क्रॉस येथे हलाखीचे जीवन कंठणाऱ्या एका असहाय्य वृद्ध दांपत्याला जीवनावश्यक साहित्याची मदत करून दिलासा देण्यात आला.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, जांबोटी रस्त्यावरील बामणवाडी क्रॉस येथे एक वृद्ध जोडपं कोणाच्याही आधाराशिवाय एका छोट्या खोलीत हलाखीचे जीवन जगत असल्याची माहिती सागर मुतकेकर यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलला (एफएफसी) दिली. सदर माहिती मिळताच एफएफसीच्या सदस्यांनी त्या वृद्ध दांपत्याची त्वरेने भेट घेऊन विचारपूस केली. राजाराम अण्णाजी मोहिते (वय 73) आणि त्यांची पत्नी सुमन राजाराम मोहिते (वय 68) हे वृद्ध जोडपं राहत असलेली खोली अतिशय छोटी असून तिथे विजेच्या दिव्याचीही सोय नाही. त्यामुळे सायंकाळनंतर रात्री या वृद्ध जोडप्याला तेलाचा दिवा वापरावा लागतो. त्यांचा एकुलता एक मुलगा श्रीधर याचे 8 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे कोणतेही साधन नाही. साधा दैनंदिन गरजेचा किराणा सामान खरेदी करण्यासाठी देखील पैसे नसल्यामुळे त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत असल्याचे पाहून एफएफसीने तात्काळ त्यांच्यासाठी किराणा सामान व जीवनावश्यक साहित्याची व्यवस्था करून दिली. तसेच भाजीपाला, दूध वगैरे खरेदी करण्यासाठी त्यांना कांही पैसे देखील देऊ केले.
सदर सेवाभावी कार्य करण्यासाठी संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखाली फेसबुक फ्रेंड्स सर्कलला माजी महापौर विजय मोरे, रेखा नायडू, अमर, अरुण माने, नितीन लोकूर, केशव कुलकर्णी, नंदिनी प्रभू, श्रीराम सेना हिंदुस्तानचे भारत नागरवाडी सागर मुतकेकर आदींचे सहकार्य लाभले. जीवनावश्यक साहित्याच्या स्वरूपात केलेल्या मदतीबद्दल वृद्ध मोहिते आजी आजोबाने कृतज्ञता व्यक्त करून उपरोक्त सर्वांना आशीर्वाद दिले.
Belgaum Varta Belgaum Varta