बेळगाव : मागील चार दिवसांपासून शहर परिसरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसाने मागील एक महिना ओढ देत आता दमदार पावसाला सुरवात झाली आहे. पुनर्वसूच्या तरण्या पावसाने शेतकऱ्यांना सावरले मात्र स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे रस्ते करण्यात आले आहेत. पहिल्या पावसातच दक्षिणेचा तथाकथित विकास पाण्यात वाहून गेला आहे. डेव्हलपमेंटच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्ते खणून ठेवल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दुचाकीस्वार आणि पादाचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्मार्ट सिटीच्या नियोजनशून्य अवैज्ञानिक कामामुळे येळ्ळूर रोड, वडगाव गणेश मंदिरापासून अन्नपूर्णेश्वर नगर मंदिराच्या ठिकाणच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. अन्नपूर्णेश्वर नगर परिसरामध्ये गटारींचे नियोजन नसल्यामुळे सांडपाणी तसेच पावसाचे पाणी साचून बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
वडगावकडून येणारे पावसाचे पाणी बेळ्ळारी नाल्याकडे जाण्यासाठी प्रथम गटारी बांधून त्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करणे अपेक्षित होते. मात्र राजकीय स्वार्थ साधण्यासाठी घिसाडघाईने हा रस्ता करून जनतेला विकासाचे गाजर दाखविण्यात आले. मात्र निकृष्ठ दर्जाचे काम केलेले रस्ते पहिल्या पावसातच वाहून गेल्यामुळे तथाकतीत विकास कामाचे पितळ उघडे पडले आहे. पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा न होता रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ते पाणी साचून राहत आहे. याच पद्धतीने स्मार्ट सिटीचे निकृष्ट नियोजन शून्य विकास कामे सध्याच्या पावसामध्ये शहरात ठीक ठिकाणी पहावयास मिळत आहेत. मंडोळी रोडवरील भवानी नगर परिसरात पावसाच्या पाण्याबरोबरच ड्रेनेजचे पाणी देखील रस्त्यावरून वाहून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या भागात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील मुख्य आरपीडी रस्त्यावर देखील ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहताना पाहायला मिळत आहे.
सध्या पडत असलेल्या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणच्या अंतर्गत रस्त्याची तसेच उपनगरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवत असताना कसरत करावी लागत आहे. गुड शेठ रोडवर देखील रस्त्याचे काम सुरू आहे. मनपाने गुडशेठ रोडवर मोठ मोठे खड्डे खणून ठेवलेले आहेत. रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे त्यामुळे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बेळगाव शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरू होऊन जवळपास सहा वर्षे लोटली तरी देखील योजना अपूर्णच आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून संतमीरा – अनगोळ या रस्त्याच्या कामाची खुदाई करून काम अपूर्ण आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना गाजर दाखविण्याच्या उद्देशाने घाईगडबडीत रस्त्याचे काम करून घेतले मात्र पहिल्या पावसातच स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरांमध्ये सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. बेळगाव हे स्मार्ट सिटी आहे की खड्डे सिटी आहे असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली बहुतांश काम अर्धवट अवस्थेत आहेत. बेळगाव शहरातील दक्षिण विभागाचा विकास हा रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये लुप्त झाला आहे की काय अशी काहीशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये स्मार्ट सिटी आणि महापालिका यांच्या कार्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta