Monday , December 8 2025
Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या पथकाने केली विविध नदीपात्राची पाहणी

Spread the love

 

बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून जिल्हाभरात चांगला पाऊस पडत आहे. कृष्णा, घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांमध्ये आवक वाढली असून, सध्या पुराची भीती नाही. रविवारी (23 जुलै) रोजी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांसह नदीपात्रासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

कृष्णा नदीत 1.07 लाख क्युसेक, घटप्रभा नदीत 30 हजार क्युसेक आणि मलप्रभा नदीत 13.50 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे आलमट्टी, हिडकल आणि नवलतीर्थ जलाशयातील पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. येत्या काळात पिण्यासाठी व पिकांना फायदा होणार आहे.

शेतकरी-जनतेने जागरूक राहावे

जिल्हाभरातील काही छोटे पूल पाण्याखाली गेले असून जनतेने आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. या तुंबलेल्या रस्त्यांचा कोणत्याही कारणास्तव वापर करू नये, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी तयारी करा

जिल्ह्यात आतापर्यंत पूरस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पाहणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिसांसह विविध विभागांकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काळजी केंद्रे देखील स्थापन केली गेली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत, लोक आणि गुरेढोरे यांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.आपत्कालीन कामांसाठी लागणारी बोटी आणि इतर उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत. याशिवाय औषधे, जनावरांचा चारा यासह सर्व बाबींसाठी संबंधित विभागाने आवश्यक तयारी केली असल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.

वनक्षेत्रातील धबधब्यांना भेट देण्यावर निर्बंध

पावसाच्या पार्श्वभूमीवर धबधब्यांना भेट देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव, नागरिकांना वनक्षेत्रातील धबधब्यांना भेट देण्यास प्रतिबंध केला गेला आहे असे जिल्हाधिकारी म्हणाले.वनविभागाचे रक्षक, टूर गाईड आणि पोलीस विभागाचे कर्मचारी देखरेखीसाठी तैनात असतील.इतर धबधब्यांमध्ये पर्यटकांना धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

पुलावरील वाहतूक निर्बंध

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील पंधरा पुलांवर पाणी वाहत असल्याने सार्वजनिक वाहतूक रोखण्यासाठी पुलांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.या पुलांच्या दोन्ही बाजूला पोलीस कर्मचारी तैनात आहेत. वाहने आणि सार्वजनिक वाहतूक प्रतिबंधित आहे.पाण्याची वाढती आवक पाहता नदीकाठच्या गावांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच पर्यटन स्थळांवर कर्मचारी तैनात करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वेदगंगा-दुधगंगा नदीपात्रातील लोकांना इशारा

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने बेळगाव तालुक्यातील सुठगट्टी गावाजवळ घटप्रभा नदीच्या प्रवाहाचे निरीक्षण केले आणि नंतर निप्पाणी तालुक्यातील वेदगंगा-दुधगंगा नदीच्या पात्राची पाहणी केली.यावेळी उपस्थित असलेल्या निप्पाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी संभाव्य पुराच्या व्यवस्थापनासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
दरम्यान, त्यांनी नदीपात्रातील भिवशी, कराडगा, जत्राटा या गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

वेदगंगा-दुधगंगा नद्यांमध्ये सर्वाधिक आवक असून दोन्ही नद्यांमध्ये एकूण २४ हजार क्युसेक पाण्याची आवक आहे.
त्यामुळे या नदीपात्रातील लोकांनी काळजी घ्यावी. शक्य असल्यास त्यांनी जनावरांसह उंच सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले. चिक्कोडीजवळील मांजरी पुलाजवळ कृष्णा नदीच्या प्रवाहाची पाहणी करणारे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना पाण्याची पातळी आणि पावसावर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. नदीपात्रातील लोकांना धोकादायक परिस्थितीबाबत पूर्वसूचना देण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीत लोक आणि गुरेढोरे यांच्या रक्षणाला प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले. नंतर अधिकाऱ्यांनी बोटीतून यदूरा गावाला भेट दिली आणि नदीकाठावर करावयाच्या उपाययोजनांची पाहणी केली.

यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी माधव गित्ते यांच्यासह महसूल, पाटबंधारे, पोलीस व इतर विभागाचे अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *