
बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी सोमवारी सकाळी शहराचा फेरफटका मारत पाहणी केली व कामचुकार सफाई कामगारांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा आयुक्तांच्या नजरेत आल्यामुळे त्यांनी सफाई कामगार व कंत्राटदारांना चांगलेच धारेवर धरले आहे. वारंवार होत असलेल्या कचरा उचल संदर्भातल्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी सोमवारी पहाटे शहरात सायकलवरून फेरी मारली व प्रत्येक वार्डातील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
आयुक्तांनी प्रत्येक प्रभागांमध्ये जाऊन कचऱ्याची उचल व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी केली. कचऱ्याची विल्हेवाट कशी होते हे पाहिले. यावेळी त्यांनी सफाई कामगारांचे बायोमेट्रिक हजेरी पाहून कामगारांना प्रोत्साहन दिले. कचऱ्याची वाहने काही वार्डात जाण्यास विलंब झाला हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक कामचुकार कामगारांना नोटीस जारी केल्या आहेत. इतकेच नाही तर ज्या ठिकाणी कचरा साचलेला आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन ही बाब कंत्राटदारांच्या निदर्शनास आणून दिली व बेळगावचे स्वच्छ व सुंदर शहरात रूपांतर करावे अशी सूचना यावेळी दिली. लवकरच अनगोळ स्मशानभूमीचे कंपाउंड बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
मनपा आयुक्तांनी सकाळी सकाळी केलेला पाहणी दौरा प्रत्येक वॉर्डात झाला तर स्वछ व सुंदर बेळगांवची संकल्पना सत्यात उतरेल व सफाई कामगार देखील नित्यनेमाने आपले काम करतील. त्यामुळे मनपा आयुक्त अशोक दुडगुंडी यांच्या पाहणी दौऱ्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे. आयुक्तांनी केलेला पहाटेचा पाहणी दौरा आणि कारवाई यामुळे गैरहजर राहणाऱ्या व कामावर उशिरा येणाऱ्या कामगारांना चांगलाच दणका बसला आहे. यापुढे तरी सफाई कामगार आपले काम व्यवस्थित करतील व बेळगावकरांचे स्वच्छ व सुंदर बेळगाव हे स्वप्न साकार होईल, अशी आशा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta