बेळगाव : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियान सुरू आहे.या अभियानांतर्गत शिलाफलक, पंच प्रण शपथ, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन या कार्यक्रमांसह प्रत्येक घरी व कार्यालयात तिरंगा फडकविण्यात येत आहे. बेळगाव महापालिकेच्या वतीने या अभियाना अंतर्गत विविध उपक्रम सुरू आहे या अंतर्गत आज सोमवारी सकाळी शहराच्या दक्षिण विभागातील जुन्या शाळा तसेच स्वातंत्र्यवीरांच्या निवासस्थानी जाऊन या मोहिमेचे जनजागृती करण्यात आली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान राबविले जात आहे. दिनांक 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रशासनाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कोणत्याही एका दिवशी सर्व पाच कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहे. यामधील शिलाफलकावरील नावांमध्ये गावातील हयात असलेले किंवा मयत स्वातंत्र्य सैनिकांचे नाव, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस विभागातील शहीद झालेल्या वीरांची नावे लिहिली जाणार आहेत. दुसऱ्या कार्यक्रमात वसुधा वंदन होणार आहे. गावातील योग्य ठिकाण निवडून 75 भारतीय वृक्षांच्या रोपांची लागवड करुन अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. या वाटिकेतील मातीला वंदन करुन मातीचा अमृत कलश तयार करण्यात येणार आहे. त्यासोबत नागरिकांनी सेल्फी काढून सामाजिक माध्यमे व Yuva.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे.
बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाच्या वतीने आज सोमवारी शहापूर येथे स्वातंत्र्यसैनिक आणि माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळी यांच्या निवासस्थानी सदर उपक्रमा संदर्भात भेट देण्यात आली. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परशुरामभाऊ नंदीहळी यांना तिरंगा ध्वज प्रदान केला. त्याचबरोबर अमृतकलशात त्यांच्या हस्ते माती स्वीकारली. यावेळी महसूल विभागाचे यल्लेश बचलपुरी, श्रीकांत हरळे, अमित यळकर, संजीव पाटील, महादेव दोडमणी, अनिल देसाई, गोकुळ पालकर उपस्थित होते. यानंतर शहापूर भारत नगर येथील शंभर वर्ष जुनी कन्नड शाळा तसेच वडगाव येथील जेल शाळेला मनपाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.
Belgaum Varta Belgaum Varta