राष्ट्रीय महामार्ग बंद : अनेक कुटुंबांचे स्थलांतर
कोगनोळी : परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरामध्ये असणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून नदी लगत असणाऱ्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे या परिसरातील अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
शनिवार तारीख 24 रोजी पावसाचा जोर ओसरला असून पूर परिस्थिती कायम आहे. येथील दूधगंगा नदीला आलेल्या पूर परिस्थितीची जैसे थे परिस्थिती आहे. यमगरणी येथील वेदगंगा नदी व कोगनोळी जवळील दूधगंगा नदीचे पाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर आल्याने सध्या राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.
दूधगंगा, वेदगंगा नदीच्या मधल्या पट्ट्यातील अनेक गावातील घरांमध्ये या पुराचे पाणी शिरल्याने शेकडो कुटुंबांना आपल्या पाळीव जनावरासह स्थलांतर करावे लागले आहे. स्थलांतरित केलेल्या लोकांची व्यवस्था प्राथमिक मराठी मुलामुलींची शाळा व अन्य ठिकाणी करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने कोगनोळी टोल नाका परिसरात वाहने थांबवण्यात आली आहेत. या थांबलेल्या वाहनधारकांना शेजारीच असलेल्या गावातील सेवाभावी लोकांच्याकडून चहा नाष्टा व जेवण आधी देण्यात येत आहे.
कोगनोळीपासून जवळच असणाऱ्या दूधगंगा नदीचा पूर पाहण्यासाठी आसपासच्या गावातील लोक गर्दी करू लागले आहेत. त्यांना पांगवण्यासाठी कर्नाटक पोलिसांच्याकडून किरकोळ लाठीमार करण्यात येत आहे.
रुग्णाला घेऊन गाडी पुराच्या पाण्यात
कुर्ली तालुका निपाणी येथील लंबे नामक रुग्णाला कागल येथे दवाखान्याला नेण्यासाठी खाजगी चार चाकी गाडी पुराच्या पाण्यात घालण्यात आली. गाडी निम्म्यापर्यंत जाऊन अडकली. येथे उपस्थित असणाऱ्या युवकांनी व ग्रामस्थांनी त्यामध्ये असणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांना सुरक्षितस्थळी आणले. नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने चार चाकी गाडी बाहेर काढण्यात आली.
या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नदी परिसरात नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Check Also
बेळगाव ते पंढरपूर स्पेशल ट्रेन
Spread the love बेळगाव : कार्तिक एकादशी निमित्त दिनांक 9 नोव्हेंबर 2024 ते 16 नोव्हेंबर …