बेळगाव : समर्थनगर येथे गेल्या दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात मार्केट पोलिसांना यश आले असून एका चोरट्याला गजाआड करून त्याच्याकडील सुमारे 10 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव यासीन हासिम शेख (वय 23, रा. निप्पाणी जि. बेळगाव) असे आहे. समर्थनगर येथील एका घरात चोरट्यांनी डल्ला मारून सोन्या -चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना गेल्या 20 मे 2023 रोजी उघडकीस आली होती.
याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एन. व्ही. बरमनी यांच्या नेतृत्वाखाली मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरीचा छडा लावत यासीन शेख याला अटक केली. तसेच त्याच्याकडील सुमारे 10 लाख रुपये किमतीचे 231 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 140 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले.
या पोलीस कारवाईत पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर, पोलीस उपनिरीक्षक महांतेश मठपती, पोलीस कॉन्स्टेबल शरतकुमार खानापुरे, विश्वनाथ माळगी, शंकर कुगटोळ्ळी, खादरसाब, लक्ष्मण कडोलकर, आशिर जमादार, शिवानंद चंडकी, विनोद जगदाळे, शिवप्पा तेली व संजू पात्रोट यांचा समावेश होता. या सर्वांचे शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta