Wednesday , April 22 2026
Breaking News

झेंडा चौक सार्व. गणेशोत्सव मंडळ अध्यक्षपदी अमित किल्लेकर

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ (झेंडा चौक) मार्केट बेळगाव या शतायुषी मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी अमित किल्लेकर, सेक्रेटरीपदी राजू हंगिरगेकर व खजिनदारपदी अजित सिद्दण्णावर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

लोकमान्य टिळकांच्या हस्ते 1905 साली स्थापन झालेल्या आणि गेली 119 वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या बेळगावातील मानाच्या झेंडा चौक -मार्केट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची बैठक चंद्रकांत दोरकाडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत 2023 सालाकरिता मंडळाच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. त्यानुसार अमित किल्लेकर यांची अध्यक्ष, राजू हंगिरगेकर यांची सेक्रेटरी आणि अजित सिद्दण्णावर यांची खजिनदार म्हणून एकमताने निवड केली गेली. बैठकीत प्रतिवर्षाप्रमाणे पारंपरिक व धार्मिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरले. त्याचप्रमाणे यंदाची श्री मूर्ती मूर्तिकार विनायक मनोहर पाटील आणि मंडप डेकोरेशन अमित खांडेकर यांना सोपविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे श्री गणेश आगमन व विसर्जना दरम्यान डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्य झांज पथक लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या खेरीज फटाकेबाजीलाही फाटा देण्याचे ठरले.

श्री गणेशोत्सवानिमित्त यंदाही सलग 19 व्या वर्षात मानाची “श्री गणेश” शरीर सौष्ठव स्पर्धा येत्या 22 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्याचे आणि ती महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीनही राज्यांसाठी खुली ठेवण्याचे ठरले. त्याच दिवशी करेला स्पर्धा घेण्याचा निर्णयही घेतला गेला. श्री गणेशोत्सव काळात विविध सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच गणेशोत्सवाचे अंतिम तीन दिवस गणेश भक्तांना चहा व बिस्किटाचे वाटप करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीस मंडळाचे विकास कलघटगी, मोतीचंद दोरकाडी, राजू गाठवी, आनंद पाटणेकर, विनायक घसारी, वसंत कित्तूर, सचिन हंगिरगेकर, पवन हंगिरगेकर, मिलिंद पाटणेकर, गिरीश पाटणेकर, अनिल जैन, वृषभ दोरकाडी, मंजुनाथ बडीगर, आनंद अंकले, प्रदीप सिद्दण्णावर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *