कागवाड : कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. मयुरी मोहन घाटगे हिने राणी चन्नमा विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळविल्याबद्दल महाविद्यालयाच्या वार्षिक सोहळ्यात रोख रक्कम, पदक आणि प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. ए. कर्की होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सी. के. नावलगी यांच्यासह, प्रो. बी. ए. पाटील, प्रो. व्ही. एस. तुगशेट्टी, परमपूज्य यतीश्वरानंद स्वामी, आदर्श विद्यार्थी आकाश गावडे, आदर्श विद्यार्थिनी पद्मजा नरोटे उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना शिवानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. कर्की म्हणाले, ग्रामीण भागातील मुली अनेक अडचणींना सामोरे जात शिक्षण घेत आहेत. इतकेच नाही तर देदीप्यमान यश देखील मिळवत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली मयुरी घाटगे होय. वडील शेती करतात. कुटुंबात तसे फारसे कोणी जास्त शिकलेले नाही. अशा वातावरणात वाढलेल्या मयुरीने राणी चन्नमा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील पदवी महाविद्यालयामधील वाणिज्य शाखेतून सातवा क्रमांक मिळवत सुवर्णपदक विजेती ठरली आहे. तिने आपल्या आई- वडिलांचे नाव तर मोठे केले आहेच, त्यासोबत शिवानंद महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मयुरी हीचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. सी. के. नावलगी यांनी विद्यार्थ्यांना समाजात नैतिक मूल्यांची आज केवढी गरज असल्याचे सांगत भविष्यात माणूस म्हणून चांगले जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले.
प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत डॉ. एस. पी. तळवार यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. जे. के. पाटील यांनी केले. या वार्षिक सोहळ्यात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. प्रकाश पाटील, श्री. के. ए. चौगला, डॉ. श्रीमती अश्विनी सवदत्ती, श्री. कल्लिनाथ उप्पार इत्यादीनी विविध क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
२०२१-२२ सालच्या महाविद्यालयातील ‘ज्योती’ नियातकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संपादिका डॉ. डी. डी. नगरकर यांनी ‘ज्योती’ विषयी उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंदकुमार जक्कणावर आणि प्रा. एस. पी. बिरादार यांनी केले. आभार प्रा. आर. एस. नागरेड्डी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta