बेळगाव : उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके पक्षांतर करणार याबाबत प्रसारमाध्यमांवर उलटसुलट चर्चा सुरू आहे. माजी आमदार अनिल बेनके यांना पक्षाने विधानसभेचे तिकीट नाकारल्यामुळे ते पक्षांतर करणार असल्याचे चर्चेला उधाण आले होते. मात्र यात काही तथ्य नाही ती केवळ अफवाच असल्याचे माजी आमदार अनिल बेनके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
ते बोलताना पुढे म्हणाले की, यापूर्वी देखील पक्षाने आपल्याला दोन वेळा विधानसभेचे तिकीट नाकारले होते. तिसऱ्यांदा आपल्याला संधी मिळाली व मी आमदार झालो. त्यानंतर आपल्याला तिकीट देण्यात आले नाही त्यामुळे आपण खचून न जाता पक्षाच्या तत्वा विरोधात आपण कोणतेही काम केलेले नाही आणि भविष्यात करणार देखील नाही. यापूर्वीही आपण भाजपचा कार्यकर्ता होतो आणि भविष्यातही राहणार. आपण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच्या संपर्कात नाही. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याशी आपली भेट ही सहा महिन्यांपूर्वी झाली होती. प्रसारमाध्यमाद्वारे चर्चेत असलेली बातमी साफ खोटी आहे. आपण काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याच्या संपर्कात नाही. आगामी काळात देखील आपण भाजपसाठीच सक्रिय असणार असून जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, जर पक्षाने आपल्याला संधी दिली तर आपण नक्कीच लोकसभा लढू. असे सांगत आपण देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर आपल्याला तिकीट मिळाले नाही तर पक्ष जो उमेदवार ठरवेल त्यांना आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta