
बेळगाव : येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी गणपती आगमन व विसर्जन मिरवणुक मार्गाची पाहणी केली. गणेशोत्सव काळात विविध सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसमवेत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धारामप्पा, कायदा व सुव्यवस्था पोलीस उपायुक्त एस. टी. शेखर, गुन्हा व वाहतूक पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर, मार्केट उपविभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी, खडेबाजार उपविभागाचे एसीपी अरुणकुमार कोळ्ळूर, हेस्कॉम शहर उपविभागाचे कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे संजीव हणमन्नावर, महापालिकेच्या अधीक्षक अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विसर्जन मार्गाची पाहणी केली व विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत माहिती जाणून घेतली.
गणेशोत्सव काळात गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनाच्या वेळी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्या अनुषंगाने मिरवणूक मार्गातील रस्त्याची डागडुजी करण्याबाबत तसेच रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे, मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटनी करणे, तसेच मार्गावर लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा हटविणे व गणेशोत्सव मंडळांना तात्काळ वीज जोडणी देण्याबाबत दक्षता घ्यावी अश्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याचप्रमाणे मिरवणूक मार्गावरील उघड्या असलेल्या गटारींवर लवकरात लवकर फरशी घालून बंदिस्त करण्यात याव्या अश्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या.
गणेशोत्सव काळात गणेश मंडळ परिसर स्वच्छ ठेवणे, गणेशोत्सवाला परवानगी देणे, विसर्जन स्थळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवणे, त्याचबरोबर गणेशोत्सवाशी संबंधित सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहे. बेळगाव शहरात परंपरेप्रमाणे काही जण दीड दिवसापासून गणेश मूर्तींची विसर्जन करण्यास सुरुवात करतात त्यापूर्वी विसर्जन नावावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत.
यावेळी मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, कार्यकारी सचिव आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, लोकमान्य टिळक सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव कार्याध्यक्ष सुनील जाधव आदीसह स्थानिक नगरसेवक हेही उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta