बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने अंगणवाडी विद्यार्थ्यांना पौष्टीक आहार म्हणून अंडे देण्याची योजना राबविली आहे. मात्र, यामध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांना अंडे देण्याची सक्ती होवू नये, अशी मागणी समस्त शाकाहारी नागरिक महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाप्रशासनाला सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सरकारच्या योजनेमुळे शाकाहारी विद्यार्थ्यांना देखील अंडे खाण्याची सक्ती करण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांना मांसाहाराची सवय होण्याचा धोका आहे.
आरोग्याला अपायकारक असणार्या मांसाहाराचे अशाप्रकारे समर्थन केले जावू नये. तसेच विद्यार्थ्यांना शाकाहार सेवन करण्यास अधिक प्रोत्साहन देणारी योजना सरकारने राबविली, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. सरकारची योजना विद्यार्थ्यांना आहार पुरविण्यासाठी योग्य आहे मात्र त्यामधून कोणत्याही घटकातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये अशी मागणी करण्यात आली असे मागणे मांडण्यात आले.
निवेदन सादर करतेवेळी गोकाक येथील विश्वगुरू बसवमंडप संस्थेचे अध्यक्ष प. पू. बसवप्रकाश स्वामीजी आणि समस्त शाकाहारी नागरिक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांच्यासह विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते.
