
बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. बेळगाव शहर तसेच परिसरात आज गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी तसेच गणेशोत्सव मंडळात जल्लोषात स्वागत करण्यात आले. घराघरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू होती. मागील महिनाभरापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी करण्यात मग्न होते. विविध देखावे आणि सजावटी करण्यासाठी थोरामोठ्यांपासून बालचमू देखील सहभागी झाले होते. आज चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाचे जल्लोषात स्वागत करून भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
सजावटीच्या विविध साहित्यानी बाजारपेठ फुलून गेली होती. विविध प्रकारचे पडदे आणि कागदी फुलांच्या माळा तसेच रंगीबेरंगी लायटिंगच्या माळा खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळत होती. सार्वजनिक मंडळे तसेच घरात देखील रात्री उशिरापर्यंत जागून गणपतीची आरास करण्यात गणेशभक्त मग्न झाले होते.
सोमवारी दुपारनंतर चतुर्थीचा मुहूर्त असल्यामुळे अनेकांनी काल सोमवारी रात्री गणपती घरी आणले तर काहींनी मंगळवारी सकाळीच गणपती आणने पसंत केले. अनेक ठिकाणी लाडक्या बाप्पाला वाजतगाजत घरी आणून मूर्ती प्रतिष्ठापना केली. आज दिवसभरात ढोलतश्याच्या गजरात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्यांची गर्दी पहावयास मिळत होती. घराघरात आज पहाटेपासून गणरायाचे स्वागत करून भक्तिमय वातावरणात विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तसेच मोदकाचा नैवेद्य देखील दाखविण्यात आला. घरातील गणपतीची पूजा आरती आटोपून तरुणवर्ग व बालगोपाळ सार्वजनिक गणेश मूर्ती आणण्यासाठी बाहेर पडले होते.
ढोलताशे व फटाक्यांची आतिषबाजी करत श्रीमुर्ती आणून पूजाविधी करण्यात आली. गणेशोत्सवासाठी फुल मार्केट देखील विविध फुलांनी बहरून गेले होते.
Belgaum Varta Belgaum Varta