बेळगाव : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी येत्या मंगळवार दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव शहरातील केपीटीसीएल भवन येथे जिल्हा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा पातळीवर सार्वजनिकांच्या निवेदनांचा गांभीर्याने विचार केला जावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरमहा जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
सार्वजनिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दरमहा जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले जावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार येत्या 26 सप्टेंबर रोजी बेळगावमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे या जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिले जाणार आहे. तरी या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी लेखी स्वरूपात मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा जिल्ह्यातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले.
प्रत्येक अर्ज लवकरात लवकर निकाली काढावा. शासनस्तरावर उपाययोजना करावयाची असल्यास ती तातडीने संबंधितांकडे पाठवावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्ह्यातील जनतेचे तक्रार अर्ज सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली पोर्टलवर नोंदवायचे आहेत. अर्जाची नोंदणी होताच, अर्जदाराच्या फोन नंबरवरही पावतीची माहिती पाठवली जाईल. त्यानुसार विहित मुदतीत तो निकाली काढावा लागेल. त्यामुळे त्या दिवशी आलेल्या अर्जांवर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी अधिकार्यांनी पूर्वतयारी करावी. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, जनता दर्शनमध्ये स्वतंत्र काउंटर उघडणे याबाबत तालुका पंचायत व ग्रामपंचायत विकास अधिकार्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये योग्य ती जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या.
बैठकीला निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, पोलीस अधिकारी अधीक्षक एम. वेणुगोपाल आदी उपस्थित होते.