चेअरमन डी. जी. पाटील- संस्थेची 23 वी सर्वसाधारण सभा संपन्न
येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को -ऑप. सोसायटीची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या सभागृहात अगदी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे यांनी नेताजी प्रतिमेचे पूजन केले, त्यानंतर सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील, व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, नेताजी युवा संघटनेचे सेक्रेटरी के. एन. पाटील, संचालक प्रा. सी. एम. गोरल, संचालिका सौ. अस्मिता पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक नेताजी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन कृष्णा पाटील यांनी केले, यावेळी बोलताना सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात तीव्र स्पर्धा असून सुद्धा अनेक अडचणीवर मात करत, सोसायटीचे भागधारक, ठेवीदार व हितचिंतक यांचा विश्वास संपादन करून नेताजी मल्टीपर्पज सोसायटीने अल्पावधीतच गरुडझेप घेतली आहे. संस्थेच्या ठेवीमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे, त्याचबरोबर नियोजनबद्ध कारभार व योग्य व गरजू व्यक्तींनाच कर्जाचे वाटप यामुळे संस्थेची वार्षिक उलाढाल 68 कोटीवर पोहचली आहे, संस्थेकडे सध्या 22 कोटीच्या वर ठेवी आहेत, संस्थेचे भागभांडवल 27 कोटीवर आहे, यावर्षी संस्थेने साडेतीन लाखावर निव्वळ नफा मिळवला आहे. पारदर्शक कारभार, काटकसर, संचालक, सल्लागार, कर्मचारी, पिग्मी संकलक यांच्या विनम्र व तत्पर सेवेमुळे नेताजी सोसायटीने सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे, संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे. संस्थेने येळ्ळूर गावांमध्ये नेताजी मराठी सांस्कृतिक भवन बांधून लोकांची चांगली सोय करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, प्रा. सी. एम. गोरल यांनीही आपले विचार व्यक्त केले. संस्थेच्या वतीने सौ. निकिता कणबरकर हिने डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल, तसेच उत्कृष्ट सभासद म्हणून महादेव कुगजी यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अहवालाचे वाचन करण्यात आले. ताळेबंद पत्रकाचे वाचन सेक्रेटरी दीपक हट्टीकर यांनी केले, नफा तोटा पत्रकाचे वाचन चांगदेव मुरकुटे यांनी केले, नफा विभागणी पत्रकाचे वाचन सौ. कांचन पाटील यांनी तर अंदाजपत्रकाचे वाचन सौ. कल्याणी पाटील हिने केले. यावेळी सोसायटीचे संचालक व सल्लागार यांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे संचालक सी. एम. उघाडे, बी. डी. छत्र्यान्नावर, मीनाजी नाईक, कल्लप्पा बंडाचे, सौ. अस्मिता पाटील, रवींद्र गिंडे, परशराम गिंडे, गणपती हट्टीकर, पांडुरंग घाडी, प्रभाकर कणबरकर, अनिल पाटील, शंकर मुरकुटे, अनिल मुरकुटे, रविकांत पाटील, वसंत मुचंडी, जोतीबा गोरल, विजय धामणेकर, रवि कणबरकर, परशराम कुंडेकर, महादेव घाडी, ज्योती यरमाळकर, वैष्णवी मुरकुटे, मुक्ता लोहार, संगीता दणकारे आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. शेवटी उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे यांनी आभार मानले.