बेळगाव : जनतेला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बंगळुरूला पायपीट करावी लागू नये यासाठी स्थानिक पातळीवर जनता दर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. असे प्रतिपादन कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी आम. प्रकाश हुक्केरी यांनी केले. आज मंगळवारी (२६ सप्टेंबर) शहरातील केपीटीसीएल कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित जनता दर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा प्रशासन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. मात्र, जनतेची भटकंती टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या इच्छेनुसार जनतादर्शन कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानी बोलताना आमदार आसिफ (राजू) सेठ म्हणाले की, जनतेला जनता दर्शनात सहभागी होऊन त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवणे शक्य होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी उपलब्ध असल्याने अधिकाऱ्यांनी लोकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, जिल्हा प्रभारी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला तर तालुकास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दर पंधरवड्याला जनता दर्शन घेण्यात येणार आहे.
जनता दर्शनाचा उद्देश स्थानिक पातळीवर लोकांच्या तक्रारी सोडवणे हा आहे. लोकांच्या तक्रारी घेण्यासाठी आठ काउंटर सुरू करण्यात आले आहेत. येथे प्राप्त झालेल्या अर्जांची नोंदणी IPGRS पोर्टलवर केली जाईल.
जिल्हास्तरावर सोडवता येणारे अर्ज तात्काळ निकाली काढण्यात येतील. राज्य शासनाच्या स्तरावर ज्या अर्जांचे निराकरण करता येईल, ते पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. सरकार वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जनता दर्शन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.