बेळगाव : पुढील वर्षी बिजगर्णी (ता. बेळगाव) येथे महालक्ष्मी यात्रा भरविण्याबाबत शुक्रवारी (ता. २०) दुपारी झालेल्या बैठकीतील वादावादीनंतर रात्री पुन्हा दोन गटांत हाणामारी झाली. त्यात काहीजण किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी सहाजणांवर वडगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
बिजगर्णी गावात यंदा महालक्ष्मी यात्रा भरविण्याची चर्चा वर्षभरापासून सुरू आहे. याबाबत शुक्रवारी सकाळी गावात बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, मंदिर बांधकामासंबंधीचा हिशेब मागितल्यावरून वादावादी झाली. ग्रामस्थांनी हस्तक्षेप केल्यामुळे वादावर तात्पुरता पडदा पडला. मात्र, शुक्रवारी रात्री याच विषयावरून पुन्हा दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी काहीजण किरकोळ जखमी झाले. यामुळे दिवसभर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या गावची लक्ष्मी यात्रा बिजगर्णीत होते. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन लक्ष्मी यात्रा भरविण्याबाबतचा निर्णय होणार होता. मात्र, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.