बेळगाव : अबकारी खात्याच्या पथकाने पिरनवाडी क्रॉस येथे गोव्याहून दारूची बेकायदा वाहतूक करणारी एक लॉरी आणि तिच्यात दडविलेली 43 लाख 93 हजार 700 रुपये किमतीची दारू असा एकूण 63,93,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना आज पहाटे घडली.
बेळगावचे अप्पर अबकारी आयुक्त डॉ वाय. मंजुनाथ, अबकारी जंटी आयुक्त फिरोज खान, बेळगाव दक्षिण जिल्ह्याच्या उपायुक्त वनजाक्षी एम. आणि विजय हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावचे अबकारी उपाध्यक्ष रवी मुरगोड यांच्या नेतृत्वाखाली अबकारी उपनिरीक्षक मंजुनाथ मेळ्ळीगेरी, ज्योती कुंभार, पुष्पा गडादे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी परसप्पा तिगडी, आनंद पाटील, विनायक भोरण्णावर व बसवराज यांनी उपरोक्त कारवाई केली.
या पथकाने आज रविवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास पिरनवाडी क्रॉस येथील संगोळी रायण्णा सर्कल येथे गोव्याहून येणारी ईस्टर लॉरी (क्र. एपी 39 युजे 8600) अडविली.
तसेच झडतीमध्ये लॉरीच्या कंटेनरमध्ये दडवून ठेवलेल्या रट्टाच्या 250 बॉक्समधील विविध 21 नमुन्यांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. बाजारभावानुसार जप्त केलेल्या या दारूची किंमत 43 लाख 93 हजार 700 रुपये इतकी होते.
अवैध दारू साठा सापडल्यामुळे लॉरी देखील जप्त करण्यात आली असून या एकूण मुद्देमालाची किंमत 63 लाख 93 हजार 700 रुपये इतकी होते. अबकारी पथकाने लॉरी अडवताच लॉरीच्या चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.