Tuesday , October 22 2024
Breaking News

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावचे सुवर्ण विधानसौध सज्ज

Spread the love

बेळगाव :   तब्बल दोन वर्षानंतर बेळगावच्या हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवार दिनांक 13 डिसेंबर पासून सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान कोरोना संसर्गाची धास्ती घेत काटेकोर नियमांच्या अंमलबजावणीत बेळगावात उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. महामारीच्या काळातील हे पहिलेच अधिवेशन बेळगावात पार पाडत असताना या अधिवेशनावर कोरोनाची छाया दिसून येत आहे.

अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ आणि आमदार बेळगावला येत आहेत. मंत्री आणि लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारी पुढील अकरा दिवस बेळगाव तळ ठोकून जाणार आहेत. बेळगावातील विविध हॉटेलांमध्ये मंत्री आणि आमदारांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर अधिवेशन काळात बंदोबस्त ठेवण्यासाठी बेळगाव परिसरात तब्बल तीन हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी पोलिसांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाला अधिवेशनाचा यापूर्वीचा अनुभव आहे. मात्र, कोरोनाच्या छायेत होत असलेल्या अधिवेशनामुळे प्रशासनाला मोठी खबरदारी घ्यावी लागत आहे. ज्या ठिकाणी मंत्री आणि लोकप्रतिनिधी वास्तव्य करून राहणार आहेत. त्या हॉटेलातील कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर करून घेण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ही कोरोनाची चाचणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्याच्या पहिल्या दिवशी अधिवेशनात कोरोनाची धास्ती पाहायला मिळणार आहे.
एका बाजूला विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने नेहमीप्रमाणे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी टिळकवाडी येथील व्हॅक्सीन डेपो मैदानावर महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. महामेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली तरीही नियोजित मेळावा करणारच असा निर्धार समितीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उद्या पहिल्या दिवशी अधिवेशना बरोबरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महा मेळाव्याकडे मराठी भाषकांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रत्येक वेळी अधिवेशनाच्या दरम्यान उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांसह विविध संघटना आणि संस्थांच्या वतीने सुवर्ण विधानसभेवर मोर्चे आंदोलने होत असतात. यावेळीही उद्याच्या पहिल्या दिवशी शेतकरी संघटने वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनीही चलो सुवर्ण सौधचा नारा देत, आज रविवारपासून खानापूर येथून संघर्ष पदयात्रा सुरू केली आहे. उद्या सोमवारी सकाळी आमदार निंबाळकर यांची संघर्ष पदयात्रा सुवर्ण सौधवर धडकणार आहे. त्याचबरोबर कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या वतीने बुधवार दिनांक 15 रोजी विधानसभेवर कर्नाटकातील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदेशीर मालमत्ता प्रकरण : सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात मागितली दाद

Spread the love  राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान बंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे उत्पन्नापेक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *