अतिवाडमधील शेतकरी; नेत्यांच्या सद्बुद्धीसाठी फोडले ११ नारळ
बेळगाव : तलाव निर्मितीसाठी बेक्कीनकेरी (ता. बेळगाव) ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील अतिवाड गावात १५ वर्षांपूर्वी भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र, त्या मोबदल्यातील भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्याचा निषेध नोंदवत भरपाई द्या, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा अतिवाड ग्रामस्थ आणि राष्ट्रीय रयत संघातर्फे देण्यात आला. तसेच नेत्यांसह अधिकाऱ्यांना सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशमार्गावर ११ नारळ फोडले.
अतिवाड शेतकरी, राष्ट्रीय रयत संघ कार्यकर्ते आणि शेतकरी नेते प्रकाश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. भरपाई संदर्भामध्ये प्रशासकीय पातळीवर दिरंगाई आणि राजकीय नेत्यांनी दाखविलेल्या अनास्थेचा निषेध नोंदविण्यात आला. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून ठिय्या आंदोलनही करण्यात आले. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी स्वीकारले. तलाव निर्मितीसाठी लघु पाटबंधारे विभागाकडून अतिवाड येथील सुमारे ६० एकर सुपीक जमीन संपादित करण्यात आली आहे.
मात्र, जमिनीच्या मोबदल्यात भरपाई मिळालेली नाही. यासाठी गेल्या १५ वर्षांपासून प्रतीक्षा सुरू आहे. त्यामुळे एकीकडे कसण्यासाठी जमीन राहिलेली नाही. उदरनिर्वाहाचे साधनही हिरावून घेण्यात आले आहे. त्यामुळे जमिनीच्या मोबदल्यात सध्याच्या बाजारभावानुसार भरपाई मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta