बेळगाव : भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरसह मराठीबहुल सीमाभागात कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे बुधवारी (दि. १) काळा दिन पाळण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता संभाजी उद्यानापासून निषेध फेरी निघणार असून मराठा मंदिर येथे जाहीर सभा होणार आहे. या फेरीतील महाराष्ट्रातील नेत्यांच्या सहभागाबाबत लोकांत उत्सुकता आहे.
पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी, काळ्या दिनाची फेरी निघणारच, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने दिली आहे. त्यानुसार शहरात विविध ठिकाणी जागृती बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून काळ्या दिनाच्या फेरीत मराठी अस्मिता दर्शवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. केंद्र सरकारने मराठी भाषिकांवर केलेल्या अन्यायाविरोधात सकाळी ९ वाजता संभाजी उद्यानपासून शहापूर, टिळकवाडी परिसरात निषेध फेरी निघणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता मराठा मंदिर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत महाराष्ट्रातील नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे बोलताना काळ्यादिनाला महाराष्ट्रातून नेते येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे काळ्यादिनाला कोणते नेते उपस्थित राहणार, याबाबत लोकांत उत्सुकता दिसून येत आहे. काळ्यादिनाबाबत सोशल मीडियावरही जोरदार जागृती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सोमवारी (दि. ३०) पोलिस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांनी काळ्यादिनाची फेरी काढू नका, अशी विनंती केली. पण, गेल्या ६७ वर्षांपासूनची ही परंपरा असून सीमाप्रश्नाची तड लागेपर्यंत आमची फेरी निघणारच आहे. तुम्ही परवानगी दिला नाही तरी आमची फेरी निघणारच, असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण-पाटील, विकास कलघटगी आदी उपस्थित होते. काळ्या दिनाच्या फेरीत मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी शिस्तीत सहभागी व्हावे आणि आपली अस्मिता दाखवून द्यावी, असे आवाहन शहर आणि तालुका म. ए समितीने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta