बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचा विधीवत पूजनाने आज शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
मार्कंडेय साखर कारखाना स्थळी आज सकाळी कारखान्याचे चेअरमन तानाजीराव पाटील यांच्या हस्ते उसाच्या मोळीचे विधिवत पूजन करून ऊस गाळपासाठी टाकण्याद्वारे गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. सवाद्य पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन आर. आय. पाटील, माजी चेअरमन विद्यमान संचालक अविनाश पोतदार, संचालक ज्योतिबा आंबोळकर, सुनील अष्टेकर, बाबासाहेब भेकणे, बसवंत मायानाचे, शिवाजी कुट्रे, बाबुराव पिंगट, सिद्धाप्पा टुमरी, बसवराज गाडगे, लक्ष्मण नाईक, वनिता अगसगेकर, चेतक कांबळे, वसुंधरा माळोजी आदींसह विविध पतसंस्थांचे पदाधिकारी प्रतिनिधी शेतकरी आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तानाजीराव पाटील म्हणाले, या गळीत हंगामात जवळपास 3 लाख मॅट्रिक टन इतक्या उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखान्यासमोर आहे. त्याचप्रमाणे आसपासचे साखर कारखाने किती दर देतात हे पाहून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला समाधानकारक असा दर देण्यात येईल असे सांगून तरी शेतकऱ्यांनी मार्कंडेय साखर कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पाठवावा, असे आवाहन केले. व्हा. चेअरमन आर आय. पाटील म्हणाले की, मार्कंडे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. मात्र सदर गाळपासाठी या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस साखर कारखान्याकडे आणून सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे कारखान्यासह शेतकऱ्यांचा आर्थिक कणा देखील मजबूत होईल. कारखान्याच्या भांडवलाकरिता सर्वांनी सहाय्य करावे असे आवाहन करून इतर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाला जो दर देतील तोच दर आम्ही देऊ असे स्पष्ट करताना आर. आय. पाटील यांनी यावेळचे गाळप 3 लाख टनाहून जास्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta