बेळगाव : मुतगा पीकेपीएसमध्ये गैरव्यवहाराचा आरोप करत जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत आपण अन्नत्याग करणार असा निर्धार करून आमरण उपोषण करणाऱ्या सचिन पाटील या युवा शेतकऱ्याला आज पाचव्या दिवशी यश आले आहे. सहकार खात्याकडून विशेष पथकाद्वारे तात्काळ मागील दहा वर्षाचे ऑडिट करणार असे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी ए. आर. सुरेश गौडा, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर आणि ग्रामीण आमदार मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत युवा शेतकरी सचिन पाटील यांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी शेतकरी नेते सिद्धनगौडा मोदगी, सुनील अष्टेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
संबंधित अधिकाऱ्यांनी मुतगा पीकेपीएस संस्थेत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांचे थकीत पैसे तात्काळ देण्याची सूचना करण्यात आली असून मुतगा पीकेपीएसचे मागील दहा वर्षाचे ऑडिट करण्याचे आश्वासन मिळाले आहे. मुतगा कृषी पत्तीन सहकारी संस्थेचे सेक्रेटरी व पदाधिकाऱ्यांनी या उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवली होती. मात्र युवा शेतकरी सचिन पाटील यांच्या भूमिकेमुळे सहकार खाते देखील ऍक्शन मोडवर आले असून सचिन पाटील यांच्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.