बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई यांच्या बेळगाव शाखेच्या वतीने शालेय स्तरावरील संवाद लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बेळगाव आणि परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. ही स्पर्धा गट अ (५ वी ते ७ वी) आणि गट ब (८ वी ते १० वी) अशा दोन गटात पार पडली. दोन्ही गटात मिळून एकूण ९२ स्पर्धकांनी यात भाग घेतला. या स्पर्धेचा निकाल व बक्षिस वितरण समारंभ १० डिसेंबर २०२३ रोजी लोकमान्य ग्रंथालय, अनगोळ रोड, टिळकवाडी, बेळगाव येथे सकाळी १० ते १२ या वेळेत पार पडला. ज्येष्ठ लेखिका आणि नाट्य दिग्दर्शिका सौ. मेधा मराठे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. व्यासपीठावर अध्यक्षा वीणा लोकूर आणि प्रमुख कार्यवाह पुष्कर ओगले उपस्थित होते.
यावेळी बोलताना मराठे म्हणाल्या की, संवाद लेखन हे नाटकातील अतिशय महत्वाचा भाग असून तो लिहताना खूप काळजी घेतली गेली पाहिजे. पात्राचं वय, शिक्षण, सामाजिक स्थान यानुसार संवाद लिहले गेले पाहिजेत. तसेच सध्याच्या बोली भाषेत संवाद लिहले गेले पाहिजेत. तसेच काळानुरुप संवादांमध्ये त्या त्या काळानुसार भाषा वापर करावा जेणे करून संवाद जास्त वाचनीय होतील आणि कलाकारालाही सोपं जाईल आणि नाटक उठावदार बनते. गुगल आणि इतर सर्च इंजिन्सचा वापर माहिती गोळा करण्यासाठी करून त्या नुसार नवीन कल्पनांवर संवाद लेखन करण्याचे आवाहन त्यांनी स्पर्धकांना केले. स्पर्धेचे परिक्षण ही त्यांनीच केले असल्यामुळे त्यांनी आलेल्या संवादांचे योग्य विश्लेषण करून काय करायला हवे आणि नको होते हे सांगितले. अध्यक्षा सौ. वीणा लोकूर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. श्री. चंद्रशेखर पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. सुरेखा भावे यांनी केले. यावेळी प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांनी आपापल्या संवादाचे वाचन केले. याप्रसंगी संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य, स्पर्धक, शिक्षक आणि रसिक श्रोते उपस्थित होते.