बेळगाव : पुण्यश्लोक जिजामातानी लहानपणीच शिवरायावर चांगले संस्कार घडवून त्यावेळच्या मोगली व अन्याय राजवटीविरुद्ध बंड करण्यासाठी प्रवृत्त केले. म्हणून छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन केलं, स्वराज्यातील बारा बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, यामध्ये जिजामातेचा सिंहाचा वाटा आहे. जिजामाता मुळेच शिवराय घडले व समाजासमोर अनेक वर्षापासून त्या पुण्यश्लोक जिजामाता म्हणून आदर्श आहेत. त्यांची जयंती करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. भारतीय संस्कृतीची ओळख पाश्चात देशात केवळ दोन शब्दात माझे बंधू आणि भगिनींनी अशा शब्दात करून दाखवणारे म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदनी तरुणांनावर चांगले संस्कार घडविले आहेत. तरुणांचा विकास झाला तरच या भारतीय संस्कृतीचा, धर्माचा व देशाचा विकास होईल, यासाठी त्यांनी तरुणांना चांगले मार्गदर्शन केले आहेत. म्हणून आज या दोन महापुरुषांचा जन्मदिवस म्हणून आपण “युवा दिन” साजरा करत आहोत. आज समाजाचा, देशाचा, विकासामध्ये युवकांचे स्थान मोठे आहे, यासाठी आज युवा दिन करणे गरजेचे आहे. लोकांनी या दोन्ही महापुरुषांचा आदर्श घेऊन समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य केल्यास समाजाचा नक्कीच विकास होईल, असे विचार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा आघाडीचे सरचिटणीस मनोहर संताजी यांनी केले.
शुक्रवार दिनांक १२ रोजी सकाळी ठीक १२.०० वाजता कॉलेज रोडवरील बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयामध्ये युवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक जिजामाता प्रतिमेला पुष्पहार म. ए. समितीचे कार्यकर्ते दीपक पावशे व स्वामी विवेकानंद प्रतिमेला पुष्पहार म. ए. समितीचे कार्यकर्ते नारायण सांगावकर यांच्या हस्ते घालण्यात आले. तर पूजन मनोहर संताजी यांनी केले. यावेळी पुण्यश्लोक जिजामाता की जय, स्वामी विवेकानंद की जय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी किसन सुंठकर, हरी लोहार, सचिन लोहार, बी. डी. मोहनगेकर, संजय पाटील, अनिल पाटील, अंकुश पाटील, किसन लाळगे, आदी म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.