लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक आहे. मात्र, गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच आहे. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमका कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. तरी, कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन लोकमान्य टिळक गणेश महामंडळ, बेळगाव यांच्यावतीने मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना देण्यात आले.
गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी, गणेश मूर्तीची मर्यादा किती असणार, मूर्तीचे विसर्जन नियोजन कसे असणार, मंडळासाठीची नियमावली याबद्दल कोणतीच ठोस माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार व भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याकरिता ठोस नियमावली लवकर जाहीर करावी, असे लोकमान्य टिळक गणेश महामंडळाने निवेदनाद्वारे म्हटले आहे.
लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे मानद अध्यक्ष आमदार अभय पाटील व आमदार अनिल बेनके त्याचबरोबर मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष विजय जाधव, सचिव हेमंत हावळ, उपाध्यक्ष गिरीश धोंगडी, राजकुमार खटावकर, राम घोरपडे यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेऊन सदर निवेदन सादर केले.