
बेळगाव : येथील प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. विनोद गायकवाड यांच्या ‘मिडल क्लास’ या कादंबरीला श्री कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था, कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांच्यावतीने 2023 सालचा राज्यस्तरीय मातृस्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांनी संस्थेच्या वतीने एका पत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे.
कोरोना काळात जेव्हा लॉकडाऊन होते तेव्हा गायकवाड यांनी मिडल क्लास ही कादंबरी लिहिली. मध्यमवर्गीयांच्या व्यथा, उणिवा आणि सामर्थ्यावर झगमगीत प्रकाश टाकणारी ही कादंबरी सोलापूरच्या स्वरूपदीप प्रकाशन या प्रसिद्ध संस्थेने प्रकाशित केली.
खरे तर मध्यमवर्ग हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून प्रामाणिकपणे देशाची सेवा करणारा, आयकर भरणारा, मतदान प्रक्रियेत भाग घेणारा आहे. मात्र त्याच्याकडे कोणताही राजकीय पक्ष लक्ष देत नाही, उलट त्याला गृहीत धरूनच उपक्रम राबविले जातात. सामाजिकता, राजकारण, गुंडगिरी या साऱ्यांचा ओघवता वेध घेत शिक्षण व्यवस्थेचे चित्रण केंद्रस्थानी असलेली ही कादंबरी एक मोठ्या शैक्षणिक क्रांतीकडे सुचकतेने निर्देश करते.
सीमा भागातील एका साहित्यिकाला महाराष्ट्राकडून मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta