
बिपिन चिरमोरे; ‘मराठा संस्कृती संवर्धन’चा वर्धापनदिन उत्साहात
बेळगाव : काम ही एक सेवाच असते. सेवा भावनेतून सातत्याने व प्रामाणिकपणे कार्य केल्यास कोणत्याही क्षेत्रात प्रगती साधने कठीण नाही. यासाठी मराठा समाजातील युवकांनी निष्ठेने काम करून सर्वांगीण क्षेत्रात प्रगतीची झेप घेतली पाहिजे, असे विचार पुणे येथील स्टॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक बिपिन चिरमोरे यांनी व्यक्त केले. ते येथील मराठा संस्कृती संवर्धन संघटनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शहापूरच्या महात्मा फुले रोड येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब कदंब-पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष अनिल पाटील, सचिव किशोर देसाई व जेष्ठ सल्लागार बी. बी. देसाई उपस्थित होते.
चिरमोरे यांनी मराठा समाज बांधवांनी संस्कृतीच्या संवर्धनासाठी चालविलेल्या कार्याचा गौरव केला. बी. बी. देसाई यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाने संघटित होऊन आपल्या जाज्वल्य इतिहास आणि महान संस्कृतीचे जतन करण्याची गरज व्यक्त केली व समाजातील युवकांनी इतिहासातून बोध घेऊन उज्वल भवितव्याकडे झेप घ्यावी असे आवाहन केले. आबासाहेब कदंब – पाटील यांनीही यावेळी मार्गदरश्न केले.
क्रांती विचारे हिच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. बिपिन चिरमोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दहावी, बारावी व पदवी परीक्षेत विशेष नैपुण्य मिळविलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, रोख बक्षीस व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संघटनेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा आदींचे आयोजन कर ण्यात येते. या वर्षी विविध स्पर्धातील विजेत्यांना कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
बी. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. रमेश रायजादे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. भाऊसाहेब देसाई व श्वेता देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्नेहल चव्हाण पाटील यांनी आभार मानले. यावेळी गायन व नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास ज्येष्ठ सल्लागार शिवाजीराव देसाई, युवा सेनेचे शिवराज चव्हाण – पाटील यांच्यासह संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta