बेळगाव : बेळगावतील बहुचर्चित दुसऱ्या व्होलसेल भाजी मार्केटला राज्य शासनाकडून परवाना मिळाला आहे. जय किसान व्हेजिटेबल असोसिएशनच्या पुढाकाराने पुणे-बेंगळुरू महामार्गच्या बाजूला व्होलसेल भाजी मार्केट उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन उद्या सोमवार दि. 3 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वा. होणार आहे अशी माहिती भाजी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर पाटील यांनी दिली.
एस. सी. मोटर्सजवळ पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गच्या शेजारी साडे दहा एकरात 232 व्यापारी गाळे बांधण्यात आले आहेत. प्रत्येक गाळ्यात वीज, पाणी, सौचालय, प्रसाधन गृह सुविधा देण्यात आली आहे. मंगळवारपासून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत हे मार्केट सुरू राहणार आहे. स्थानिकांना 15 गाळे राखीव ठेवण्यात आले आहेत.
या भाजी मार्केटमुळे व्यापाऱ्यांबरोबर शेकऱ्यांना ही सोयीस्कर होणार आहे. सोमवारी या भाजी मार्केटचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल बेनके असून उद्घाटक म्हणून आमदार अभय पाटील, प्रमुख पाहुणे खासदार मंगला अंगडी, आमदार सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, बुडा चेअरमन संजय बेळगावकर, कर्नाटक रयत संघटना अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, कर्नाटक राज्य भारतीय कृषक समाज अध्यक्ष लिंगराज पाटील यांच्यासह जय किसन होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर पाटील, उपाध्यक्ष मोहन मन्नोळकर, सेक्रेटरी कसीमसाब बागवान, संचालक राम हावळ, अहमद इकबाल डोनी, उमेश पाटील, सुनिल भोसले, संजय भावी, विश्वनाथ पाटील, सुरेश हावळ आदी सदस्य उपस्थित राहणार आहेत.