बेळगाव: सर्वत्र उन्हाळा चालू आहे. वाढत्या उन्हामुळे अनेकांना उष्माघाताच्या आजारांना देखील सामोरे जावे लागत आहे. बेळगावात देखील जवळपास तापमान 40° पर्यंत जाऊन पोहोचले आहे. अशा स्थितीत वकीलाने काळा कोट परिधान करून न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणं त्रासदायक होत होते. त्या अनुषंगाने राज्य वकील संघटनेने वकीलांना होणारा त्रास ओळखून उच्च न्यायालयाकडे एका अर्जाद्वारे मागणी केली होती की, एप्रिल आणि मे दोन महिन्यांसाठी वकीलांना कोट परिधान न करता न्यायालयीन कामकाजात सहभागी होण्याची मुभा द्यावी. वकील संघटनेच्या या मागणीला सहमती देत माननीय उच्च न्यायालयाने कर्नाटक राज्यातील जिल्हा न्यायालय आणि अपिलियन न्यायालयांमध्ये काम करणारे वकिलांना उद्या दिनांक 18 एप्रिल पासून 31 मे 2024 पर्यंत काळा कोट न घालण्याची मुभा दिली आहे
कर्नाटक राज्य वकील संघटनेचे अध्यक्ष यांनी 5 एप्रिल रोजी एका अर्जाद्वारे माननीय उच्च न्यायालयाकडे सदर मागणी केली होती. या मागणीची दखल घेत एका ठरावाद्वारे काळाकोट न घालता न्यायालयीन कामकाजात सहभागी होण्याची मुभा राज्यातील वकीलांना दिली आहे. त्यामुळे उद्यापासून जिल्हा न्यायालय तसेच ट्रायल कोर्टच्या कामकाजात भाग घेताना काळा कोट परिधान केला नाही तरी चालणार आहे. मात्र एलईन कामकाजात सहभागी होत असताना वकीलाने आपल्या नेहमीच्या सफेद नेकबँडसह सफेद रंगाचा शर्ट त्याचप्रमाणे महिला वकिलांनी देखील सफेद रंगाचे कपडे परिधान करावे, असे आवाहन उच्च न्यायालयाच्या आदेशावरून न्यायालयाचे रजिस्टर जनरल के. एस. भरतकुमार यांनी केले आहे.