बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्या घरावर अज्ञातांनी रात्री 12.00 वाजता भ्याड हल्ला करत सचिन केळवेकर यांच्यासह त्याच्या परिवाराच्या सदस्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली असून यामध्ये सचिन केळवेकर आणि सुंदर केळवेकर हे जबर जखमी झाले आहेत. निवडणुकीचे वातावरण असताना राजकीय वैमनस्यातून हल्ला करण्यात आला आहे.
मराठा आंदोलक संघर्ष योद्धा मनोज जरांगे – पाटील यांची मंगळवारी दिनांक 30 धर्मवीर संभाजी उद्यान मैदानात जाहिर सभा होणार आहे. या सभेची सोशल मीडियावर जागृती केल्यामुळे समिती कार्यकर्ते सचिन केळवेकर आणि त्यांच्या भावावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला आहे, असे सांगण्यात येत आहे. दोन्ही समिती कार्यकर्त्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री करण्यात आलेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.