बेळगाव : प्रदीप गुप्ता (६०) नामक एक व्यक्ती गेल्या पंधरा वर्षांपासून किर्लोस्कर रोड येथे किरकोळ व्यापार करून आपला उदरनिर्वाह करत होती. निराधार असलेल्या या व्यक्तीचे कोणीही नातेवाईक न्हवते. तो पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे सांगत होता.
गेले काही दिवस ही व्यक्ती सतत आजारी पडत होती, त्याला अनेकदा समाजसेवकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
अखेर रविवारी सकाळी (२८एप्रिल) प्रदीप गुप्ता यांचा खडतर प्रवास संपला.
ही व्यक्ती किर्लोस्कर रोड येथील महाराष्ट्र बँकेजवळ मृतावस्थेत असल्याची बातमी जायंट्स मेनचे सदस्य आणि नामदेव देवकी संस्थेचे अध्यक्ष अजित कोकणे यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले व जायंट्सच्या सदस्यांना घटनेबद्दल माहिती दिली.
मदन बामणे यांनी लागलीच रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला.
ते निराधार असल्याने त्यांचावर अंत्यसंस्कार कुणी करायचे हा प्रश्न निर्माण झाला असताना जायंट्स मेनचे सदस्य तसेच नामदेव देवकी संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला. पोलीस प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी जायंट्स मेनचे माजी अध्यक्ष मदन बामणे, नामदेव देवकी संस्थेचे अध्यक्ष अजित कोकणे, शेखर हालगी, निसार समशेर, नारायण कणबरकर, अशोक रेळेकर, सुनिल मुरकुटे, प्रवीण महेंद्रकर, संजय हुली, संतोष शिर्के, एमडी पायरे, मनपा कर्मचारी व इतर उपस्थित होते.