प्रभाग १९ मधील नागरिकांचा निर्धार; २५ वर्षापासून दुर्लक्ष
निपाणी (वार्ता) : शहरातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये रस्त्यावर अतिक्रमण, रस्ते, गटारी व इतर सुविधांच्यासाठी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. २५ वर्षापासून नगरपालिकेसह नेते मंडळींचे दुर्लक्ष झाल्याने हा पवित्रा घेतल्याची माहिती पंकज गाडीवड्डर यांनी दिली.
या प्रभागामध्ये जुने आश्रयनगर, नवे, जुने संभाजीनगर, टीचर कॉलनी, बाळूमामानगर, महात्मा ज्योतिबा फुलेनगर, बाबा कॉलनी, सरकार कॉलनी हा भाग आहे. या परिसरात २००५ मध्ये रस्ता झाला होता. पण पाणी योजनेसाठी हा रस्ता उखडण्यात आला आहे. सध्या या रस्त्याची वाताहात झाली असून वाहनधारक व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय परिसरातील गटारीच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी मुरत आहे. येथील मुख्य रस्त्यावरच अनेक वर्षांपूर्वी अतिक्रमण करून घराचे बांधकाम झाले आहे. याबाबत बऱ्याचदा नगरपालिकेसह नेते मंडळींकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नाही. या प्रभागात १६०० मतदान असून या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी नागेश महंती, नितीन माळगे, अरुण बुरुड, प्रताप लोकरे, सुनील जठार, कैलास केसरकर, गजानन लोहार, स्वप्निल पुणगे, विकास लोकरे, किरण लोहार, सुनिता देसाई, विमल शिंदे, सुशीला शेंडगे, शांताबाई सुतार, अलका पोवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.