तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आवाहन
बेळगाव : बेळगाव येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आज मंगळवार दिनांक ३० रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता धर्मवीर संभाजी उद्यान महाद्वार रोड येथे होत आहे.
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अनेक ठिकाणी जाहीर सभा घेऊन सरकारला आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरू करण्यासाठी भाग पाडले आहे. मराठा समाजाला एकत्रित करण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम आपले आहेत. याप्रमाणे ते आता सीमाभागातही मराठा समाजाला व मराठी भाषिकांना एकत्रित करण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी व मराठी भाषिकाला न्याय मिळवून देण्यासाठी ते या जाहीर सभेत आपले विचार व्यक्त करणार आहेत.
गेल्या ६७ वर्षापासून सीमाभागातील मराठी भाषिक न्यायापासून वंचित राहिले आहेत. हा सीमाप्रश्न सोडविण्यासाठी ही ते आपले विचार व्यक्त करणार आहेत. तरी या जाहीर सभेला सीमाभागातील मराठी भाषिकांनी व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकारीणी सदस्य, आजी-माजी लोकप्रतिनिधी, युवा आघाडीचे कार्यकर्ते, महिला आघाडीचे कार्यकर्ते, मराठी भाषिक, व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.