बेळगाव : बेळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी म्हणजेच वैशाख द्वितीयेला पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते.
यावर्षीही गुरुवार दि. ९ मे रोजी शिवजयंती साजरी होणार असून शनिवार दि. ११ मे रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. शिवप्रेमी व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात करावी, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे गुरुवार दि. ९ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून विविध गडकिल्ल्यावरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक येथे करण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी ठीक ९ वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन- आरती करण्यात येईल. तसेच सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घालून वंदन करण्यात येईल.
शनिवार दि. ११ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून यावर्षी १०५ वी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना सर्व शिवभक्त आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्यवाह मदन बामणे, कार्यवाह विजय पाटील तसेच जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आणि शिवराज पाटील यांनी केले आहे.