Saturday , December 13 2025
Breaking News

शिवजयंती निमित्त चित्ररथ देखावा मिरवणुकीस उद्या ६ वाजता नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : शनिवार दि. ११ मे रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी सहा वाजता नरगुंदकर भावे चौकातून शिवरायांच्या पालखी पूजनाने श्रीफळ वाढवून सुरु करण्यात येणार आहे. यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

शिवरायांच्या चारित्र्याचे दर्शन घडवणाऱ्या शिवजयंती चित्ररथ देखावा मिरवणुकीचा साक्षात्कार समाजाला प्रेरणादायी ठरतो. मात्र या शिवचरित्र दर्शनाचा सोहळा उभा करताना शिवरायांच्या सामर्थ्याचे प्रलयकारी दर्शन जसे बेळगांव नगरीत घडते तसे अन्यत्र घडत नाही. त्यामुळे येथील शिवजयंती उत्सवाची ख्याती दूरवर पसरली आहे. बेळगावात या दिवशी जणू शिवसृष्टीच अवतरते. याची अनुभुती प्रत्येकाला येते. ही शिवसृष्टी पाहण्यासाठी बेळगावच नव्हे तर चंदगड- निप्पाणी-कोल्हापूर-गोवा आदि भागातील शिवप्रेमी शहरात डेरेदाखल होतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजोमय जीवनाची कथा या उत्सवामधून युवापिढीस समजते. त्यांच्याप्रमाणेच आपले जीवन सामर्थ्यशाली बनवण्याची प्रेरणाही मिळते.. चित्ररथ देखाव्यांच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन व्यसनमुक्ती, महाराजांच्या राजवटीत घडलेल्या घटनांवर आधारीत हे प्रसंग सादर केले जातात. चित्ररथासमोर लाठीमेळा, लेझीम, ढाल- तलवार, दांडपट्टा, झांजपथक अशी विविध रुपं सादर करणारे मर्दानी खेळ व दृष्य शिवप्रेमींच्या डोळ्यांची पारणे फेडणारी असतात. मिरवणुकीत आबाल-वृद्धांसहा महिलांचीही उपस्थिती लक्षणीय असते.

यासाठी चित्ररथ देखावा मिरवणुकीत सहभाग घेणाऱ्या शिवजयंती मंडळांनी संयम, समन्वय, शिस्तबद्धता व शांततेने अपूर्व उत्साहात आपापल्या ठरविलेल्या विभागातून जल्लोषात चित्ररथ फिरवून लवकर मुख्य चित्ररथ देखावा मिरवणुकीत सहभागी व्हावे. जेणेकरून आपण अथक परिश्रम करून केलेला सराव, त्यातून साकार केलेल्या शिवकालीन भूमिका पाहून शिवप्रेमी नागरीकांना तुमचे कौतुक करण्याची संधी मिळेल. असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती मंडळाने केले आहे.

मिरवणुकीचा मार्ग

नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात-मारूती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदेखूट (राजेंद्रप्रसाद चौक), कॉलेज रोड, ध. संभाजी चौक, किर्लोस्कर रोड मार्गे रामलिंडखिंड गल्ली, टिळक चौक, हेमुकलानी चौक, शनिमंदीर, छत्रपती शिवाजी महाराज उड्डान पुल (कपिलेश्वर रोड) मार्गे कपिलेश्वर मंदिर जवळ मिरवणुकीची सांगता.

About Belgaum Varta

Check Also

म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *